राज्यपाल रमेश बैस यांनी दिल्या राज्यातील शाळांच्या वेळा बदलण्यासंदर्भात सूचना

“शिक्षण विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व्हावे या दृष्टीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ कमी द्यावा,” असेही रमेश बैस यांनी म्हटलं.

Shruti Patil
  • Dec 6 2023 12:00PM

महाराष्ट्र: राज्यपाल बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. ५) शालेय शिक्षण विभागाच्या सहा प्रोत्साहनात्मक योजनांचा राजभवन येथे शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. ‘बदलत्या जीवनशैलीनुसार सर्वांच्याच झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. मध्यरात्रीपर्यंत मुले जागीच असतात. परंतु, शाळांसाठी त्यांना लवकर उठावे लागते. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. मुलांची झोप चांगली व्हावी या दृष्टीने शाळांच्या वेळा बदलण्याबाबत विचार व्हावा,’ अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी मंगळवारी राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात केली.

‘शिक्षण विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व्हावे यासाठी शिक्षकांनी त्यांना गृहपाठ कमी द्यावा; तसेच खेळ व इतर कृतिशील उपक्रमांवर भर द्यावा,’ अशी सूचनाही त्यांनी केली. ‘सायबर गुन्ह्यांपासून मुलांचे रक्षण व्हावे यासाठी शाळांमध्ये व्याख्याने व सत्रांचे आयोजन केले जावे,’ असे ते म्हणाले. ‘राज्यात शेकडो सार्वजनिक ग्रंथालये आहेत. मात्र ही ग्रंथालये आज ओस पडली आहेत. बहुतांश पुस्तके जुनी किंवा कालबाह्य झाली आहेत. सर्व वाचनालयांना इंटरनेट, कम्प्युटर सुविधा देऊन नवसंजीवनी देणे आवश्यक आहे. यासाठी ग्रंथालय दत्तक योजना सुरू केली पाहिजे,’ असे त्यांनी नमूद केले.

राजभवनामधील याच कार्यक्रमामध्ये ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमाबरोबरच शालेय विद्यार्थ्यांसंदर्भातील ‘स्वच्छता मॉनिटर-2’, ‘दत्तक शाळा उपक्रम’, ‘गोष्टींचा शनिवार’, ‘माझी शाळा, माझी परसबाग’, ‘आनंददायी वाचन’ या उपक्रमांची सुरुवात करण्यात आली. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या नवीन शालेय इमारतींचे लोकार्पण करण्यात आलं. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, आयुक्त सुरज मांढरे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार