स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र

आता मराठा आरक्षणासाठी स्वराज्य प्रमुख संभाजी छत्रपती मैदानात...

Shruti Patil
  • Dec 6 2023 1:28PM

नवी दिल्ली: स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वपक्षीय खासदारांना पत्र लिहिलं आहे. सर्व पक्षाच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची दिल्ली येथे एकत्रित बैठक संभाजीराजे यांनी आयोजित केली आहे. या बैठकीसाठी हजर राहण्याचं आवाहन संभाजीराजे यांनी या पत्रातून केलं आहे.

मराठा आरक्षणासाठी लढा सुरु आहे. आज सर्वोच्च न्यायालयात आज क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी खासदारांची बैठक आजोजित केली आहे. या बैठकीत काय होणार? कोणता निर्णय होणार?, अशी चर्चा सुरू आहे.

सर्वपक्षीय खासदारांना संभाजी राजे यांनी लिहिलेलं जशास - तसं पत्र...

प्रति, मा. सर्व लोकसभा, राज्यसभा खासदार, महाराष्ट्र राज्य

विषय: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रातील लोकसभा व राज्यसभा खासदारांची दिल्ली येथे एकत्रित बैठकीबाबत…

महोदय,

मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी मागील काही वर्षांपासून संघर्ष करत आहे. यासाठी अनेक भव्य मोर्चे, आंदोलने, उपोषणे झालेली आहे. काही युवकांनी यासाठी आत्महत्या सारखा टोकाचा मार्ग निवडला. समाजाच्या भावना तीव्र आहेत. तरीही मराठा समाजाने आपली मागणी अतिशय शांततेच्या आणि संविधानिक मार्गाने पुढे आणलेली आहे.

मराठा समाजाच्या मागणीला प्रतिसाद देवून २०१४ मध्ये पृथ्वीराज चव्हाण सरकारने तर २०१८ मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कायदेशीर पातळीवर हे आरक्षण टिकले नाही.

मी स्वतः २००७ पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रात सातत्याने जनजागृती करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवत काही आंदोलने स्वतः देखील केली आहे.

राज्यसभा सदस्य असताना सभागृहात देखील हा विषय सविस्तर पणे मांडला होता. तसेच संसद परिसरात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी धरणे आंदोलन ही केले होते.

मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी आंदोलन करत महाराष्ट्र दौरा करत आहेत. मराठा समाजाचे लाखो युवक हे देखील आंदोलनात सहभाग घेत आहेत.

या पार्श्वभूमीवर माझी आपणास कळकळीची विनंती आहे की याबाबत आपण हिवाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधी या नात्याने आवाज उचलणे आवश्यक आहे.

या विषयी लवकरच नवी दिल्ली येथे महाराष्ट्रातील सर्व लोकसभा, राज्यसभा खासदारांनी एकत्रित मराठा आरक्षण मिळवण्याबाबत ठोस भूमिका ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीचे सविस्तर निमंत्रण मी लवकरच आपणास पाठवेल.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत आणि समाजाला न्याय मिळावा हि विनंती.

संभाजीराजे छत्रपती

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार